धक्कादायक: मारहाण करून तरूणाचा खून केला; मृतदेह पोत्यात घालून बंधार्यात टाकला

अहमदनगर- बंधार्यात रविवार 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या पूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. शिर्डी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील पोहेगाव येथील बाजारतळाजवळील डोर्हाळे रोड लगत असलेल्या बंधार्यात हा मृतदेह आढळून आला होता.
शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली होती.
शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवी 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ काही तासांत गंभीर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
सदर गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मयत सोमनाथ शंकर कल्लारे (वय 33 रा. रांजणगाव, ता. राहाता) मित्रासमवेत खटकळी येथे रात्रीच्या वेळी वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी करत असताना मयताने एकाचा मोबाईल घेऊन मारहाण केली. तो निघून गेला. मात्र इतर मित्रांनी का त्रास देतो असे म्हणत असताना झालेल्या मारहाणीत मयत जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.
31 डिसेंबर रोजी मृतदेह दोन दुचाकी वरुन गोणीत बांधुन मृतदेह पोहेगाव येथे फेकून देण्यात आला. या खुनात संशयित म्हणून दिनेश फुलचंद बनसोडे (वय 22), सचिन उत्तम पवार (वय 22), प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय 22), सिध्दांत प्रमोद निकाळे (वय 20) सर्व राहणार राहाता या चौघांना शिताफीने पकडण्यात आले असून आणखी संशयिताचा शोध सुरू आहे.
या खुनात जो मयत आहे त्यांच्यावर लोणी, राहाता पोलीस स्टेशन मध्ये 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात अटक करणार्या आलेले 4 आरोपी व पसार असलेले 3 आरोपी यांच्यावर राहाता- शिर्डी तसेच विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरी तसेच विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, संभाजी पाटील, अंजय अंधारे, नितीन शेलार, सुर्यकांत ढाके संदिप गडाख, राजवीर बिरदवडे यांनी काम पाहिले. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध लावला त्याबद्दल त्यांच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.