sindhutai sapkal biography : ‘चिंधी’ ते हजारो अनाथांची माई – सिंधुताई सपकाळ असा होता प्रेरणादायी जीवनप्रवास….

सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.
तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.
जन्म व बालपण
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
विवाह
विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली
जीवनातील संघर्ष
दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले
सिंधुताईंना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे
पद्मश्री पुरस्कार (2021)
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (2012)
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (2012)
महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (2010)
दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’ (2008)
पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार
शिवलीला महिला गौरव पुरस्कार
‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (1992)
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.