अहमदनगर

संगमनेरमध्ये कत्तलखाने सुरूच; पोलिसांच्या सतर्कतेमुळे 30 जनावरांना मिळाले जीवदान

अहमदनगर- संगमनेर शहरात कत्तलखाने सुरूच आहे. हे पुन्हा एकदा समोर आले आहे. संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात कत्तल करण्याच्या उद्देशाने काटवनात बांधून ठेवलेल्या 30 गोवंश जनावरांची सुटका शहर पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौशाद लालू इनामदार (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) व कमर अली सौदागर (कुरैशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

मदिनानगर परिसरातील एका काटवनात गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. नौशाद लालू इनामदार (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) याने कमर अली सौदागर (कुरैशी) यांच्या मालकीची गोवंश जनावरे संगनमत करून महाराष्ट्रात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील 30 गोवंश जनावरे काटवनात कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याची सोय न करता बांधून ठेवल्याचे आढळून आले.

 

पोलिसांनी सदर जनावरांची सुटका केली. यामध्ये गोवंश जातीचे 29 बैल व एक गायी अशी 30 जनावरे एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नौशाद लालू इनामदार (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले), कमर अली सौदागर (कुरैशी) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 790/2022 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ), (1) व प्राण्यांना निर्दयतने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 3,11 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button