अहमदनगर

आलिशान कारमधून गांजाची तस्करी; साडेपाच लाखाच्या गांजासह तिघे अटकेत

अहमदनगर- स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व तोफखाना पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत साडेपाच लाख रुपयांचा २८ किलो गांजा एका चारचाकी वाहनातून जप्त केला. येथील नगर – मनमाड रस्त्यावर शनिवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास राजपाल मॉलसमोर ही कारवाई करण्यात आली.

 

मुकेश अरुण नेटके (वय ३४, रा. शिवाजीनगर, पाटील इस्टेट, पुणे), जावेद इनायत शेख (वय २१ रा.शांतीनगर पुणे), अजय अरुण जोंजट (वय २६, रा. शिवाजीनगर, पाटील इस्टेट, पुणे) यांना आय २० कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक फौजदार राजेंद्र देवमन वाघ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार संजय खंडागळे, पोना शंकर चौधरी, पोना रविकिरण सोनटक्के, पोकॉ रोहीत येमुल, पोकॉ सागर ससाणे, पोकॉ आकाश काळे, रविंद्र घुंगासे, चापोहेकॉ बबन बेरड हे पेट्रोलिंग करत असताना उपनिरीक्षक सोपान गोरे यांना मनमाड रस्त्यावरून नगरच्या दिशेने येणाऱ्या आय २० कारमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली.

 

त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांना माहिती दिली. त्यानंतर गडकरी यांच्यासह सपोनि जुबेर मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ सुनील शिरसाठ, दत्तात्रय जपे, पोना संदिप धामणे, सुनील भरते व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजपाल दुकानाजवळ वाहन तपासणी सुरू केली.

 

संशयित कार (एमएच १२ टीएन ६०४५) नगरच्या दिशेने येताच पोलिसांनी तपासणी केली. कारची मागील काच फुटलेली व पुढील काच अर्धवट फुटलेल्या अवस्थेत आढळली. कारच्या डिक्कीत प्लॅस्टीक पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी ५.६० लाख रुपये किंमतीच्या २८ किलो गांजासह ८ लाख रुपये किमतीची आय २० कार जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button