महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांनी ‘त्याला’ पकडले

शहरातील महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणार्याला तोफखाना पोलिसांनी कल्याण रोड परिसरात पकडले. सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय 27 रा. कानडे वॉशिंग सेंटरजवळ, टिळक रोड, अहमदनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 29 एप्रिल रोजी विना प्रकाश मुके (वय 65 रा. ठाकूर गल्ली, तोफखाना) या परदेशी गल्ली येथून घरी जात असताना मोच्चीगल्लीकडून आलेल्या अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेली होती.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, सचिन बाचकर,
अहमद इनामदार, धिरज खंडागळे यांचे पथक कल्याण रोड परिसरात गस्त घालत असताना त्यांना सोन्या शिंदे विनाकारण फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.