अहमदनगर

पोलीस भरतीत ‘एवढे’ उमेदवार झाले पास; कोण ठरणार लेखी परीक्षेसाठी पात्र: वाचा

अहमदनगर- नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या 129 व चालक पदाच्या 10 जागांसाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यासाठी 11278 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 7607 उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. 3669 उमेदवार गैरहजर होते. दोन उमेदवारांनी हजर राहूनही चाचणी देण्यास नकार दिला. उपस्थित उमेदवारांपैकी 6721 उमेदवार चाचणीसाठी पात्र होऊन त्यांची चाचणी पार पडली. तर 883 उमेदवार चाचणीपूर्व तपासणीत अपात्र ठरले होते.

 

दरम्यान मैदानी चाचणी दिलेल्या 6721 उमेदवारांपैकी 25 व त्यापेक्षा अधिक मार्क मिळालेले 3278 उमेदवार मैदानी चाचणीत पास झाले आहे. तर 3443 उमेदवारांना 25 पेक्षा कमी मार्क मिळाल्याने त्यांना नापास ठरविण्यात आले आहेत. पास व नापास उमेदवारांची यादी जिल्हा पोलीस प्रशासनाने बुधवारी रात्री प्रसिध्द केली आहे.

 

दरम्यान पास झालेल्या 3278 उमेदवारांपैकी एका जागेसाठी 10 या नियमानुसार लेखी परिक्षेसाठी उमेदवार पात्र ठरविले जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव यांनी सांगितले.

 

चालक पदाच्या 10 जागेसाठी 219 उमेदवार पास झाले आहेत तर शिपाई पदाच्या 129 जागेसाठी 3059 उमेदवार पास झाले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button