नगर जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र घटले; वाचा कोणत्या तालुक्यात किती झाली पेरणी

अहमदनगर- लांबलेल्या परतीच्या पावसामुळे नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रामध्ये पेरणी होणार्या ज्वारी पिकाच्या पेरणीत यंदा लक्षणी घट आली आहे. विशेष करून उत्तर नगर जिल्ह्यातील राहुरी, अकोला, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात ज्वारीचा पेरा घटला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी पिकाची पेरणी ही पारनेर तालुक्यात 34 हजार 126 हेक्टरवर झालेली असून दक्षिणेतील शेवगाव तालुका वगळता अन्य तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र बर्यापैकी आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पेरण्या संथ गतीने पुढे सरकात आहेत.
जिल्ह्यात 2 डिसेंबरअखेर 59 टक्के म्हणजेच 3 लाख 25 हजार 949 हेक्टरवर पेरण्यापूर्ण झालेल्याची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात मुबलक पावसामुळे ऊस पिकाचे क्षेत्र वाढत आहे. आतापर्यंत 63 हजार 601 हेक्टरवर नवीन ऊसाच्या लागवडी झालेल्या आहेत. लागवडीचे हे प्रमाण 67 टक्के आहे. शेवगाव, नेवासा आणि अकोले तालुक्यात नवीन ऊस लागवडीची आकडेवारी शुन्य असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमुद आहे. सर्वाधिक ऊसाची लागवड ही पाथर्डी तालुक्यात 4 हजार 620 हेक्टरवर असून त्याखालोखाल कोपरगाव तालुक्यात 4 हजार 547 हेक्टवर झालेली आहे.
पारेनर, श्रीगोंदा, कर्जत आणि संगमनेर तालुक्यात ऊस लागवडीची टक्केवारी चांगली आहे. जिल्ह्यात अनेक भागात सध्या वापसा होवून रब्बी हंगामाच्या पिकांच्या पेरण्या जोरधरू लागल्या आहेत. शेतकरी आणि शेत मजूर सध्या शेतीच्या व्यवस्थापनात व्यस्त दिसत आहे. ज्वारीनंतर मुख्य पिक असणार्या गव्हाच्या पेरणीला वेग आला असून जिल्ह्यात 53 हजार 202 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा जोर ओसला आहे.
गव्हाच्या पिकासाठी थंडी ही आवश्यक आहे. चारा पिक म्हणून ओळख असणार्या मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून 13 हजार 127 हेक्टवर मका पिकाची पेरणी झालेली आहे. हरभरा पिकाची पेरणीचा वेग कायम असून आतापर्यंत 58 हजार क्षेत्रावर हरभर्यांची पेरणी झालेली आहे.
नगर 41 हजार 369 (76.17 टक्के), पारनेर 49 हजार 682 (71.35 टक्के), श्रीगाेंंदा 40 हजार 585 (60.43 टक्के), कर्जत 45 हजार 629 (60.94 टक्के), जामखेड 40 हजार 295 (8919 टक्के), शेवगाव 7 हजार 617 (23.18 टक्के), पाथर्डी 25 हजार 805 (66.86 टक्के), नेवासा 12 हजार 179 (27.35 टक्के), राहुरी 2 हजार 573 (10.27 टक्के), संगमनेर 11 हजार 366 (49.35 टक्के), अकोले 2 हजार 528 (30.21 टक्के), कोपरगाव 15 हजार 397 (62.82 टक्के), श्रीरामपूर 12 हजार 656 (61.59 टक्के) आणि राहाता 18 हजार 267 (74.06 टक्के).