एसपी साहेब आतातरी एलसीबीच्या बदल्या करा; दुसर्याला एक तरी संधी द्या!

सन 2022 मध्ये जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बदलीपात्र पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. बदली पात्र पोलीस अंमलदारांनी तीन पसंतीची ठिकाणे नमुद करून तसा विनंती अर्ज प्रभारी अधिकारी यांचेकडे 25 मार्च, 2022 पर्यंत सादर केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना मंडल याबाबत निर्णय घेणार आहे.
जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) अंमलदारांच्या बदल्या झाल्या नव्हता. यंदा मात्र त्या बदल्या होणे अपेक्षित आहे.
वर्षानुवर्षे एलसीबीत जीव गुंतलेल्या अंमलदारांच्या बदल्या होणार का? याकडे जिल्हा पोलीस दलाचे लक्ष लागून आहे. दरम्यान एलसीबीत येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, परंतु तेथे वर्षानुवर्षे असलेल्या अंमलदारांमुळे इतरांना काम करण्याची संधी मिळत नसल्याने अनेकांची नाराजी आहे.
‘त्या’ खास अंमलदारांच्या बदल्या होत नसल्याने जिल्हा पोलीस दलात चर्चेला पेव फुटले आहेत. एसपी साहेबांनी यंदा तरी मनावर घेऊन ‘त्या’ खास अंमलदारांच्या बदल्या कराव्यात, अशी चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.
साधारण एप्रिलच्या शेवटी या बदल्या होणे अपेक्षित आहे. आपल्या आवडीचे पोलीस ठाणे पदरात पाडून घेण्यासाठी पोलीस अंमलदारांच्या हालचालीला वेग आला आहे. तर दुसरीकडे एलसीबीत ठाण मांडून बसलेल्या अंमलदारांना त्यांची नियुक्ती एलसीबीतच कशी राहिल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
एलसीबीत सुमारे 25 अंमलदारांच्या जागा खाली होणार आहेत. यातील तीन अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. एक अंमलदार 31 मे, 2022 रोजी सेवानिवृत्त होणार असून दोघांची जिल्हा बाहेर बदली झाली आहे.
एक अंमलदाराची 2021 मध्येच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बदली झाली असून त्यांना अद्यापही सोडण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यासह 19 अंमलदारांच्या बदल्या यावर्षी होणार आहेत.
यामुळे एलसीबीतील अंमलदारांच्या बदल्याकडे जिल्हा पोलीस दलाचे लक्ष लागून आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नियमानुसार बदली होणार्या यादीमध्ये सहायक फौजदार मनोहर शेजवळ, पोलीस हवालदार दादासाहेब काकडे, सखाराम मोटे, विष्णु घोडेचोर, दत्तात्रय गव्हाणे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी
, दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक संदीप पवार, विशाल दळवी, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, पोलीस शिपाई रोहिदास नवगिरे, योगेश सातपुते, रोहीत मिसाळ, विनोद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे, किरण जाधव, विजय धनेधर यांचा समावेश आहे.