अत्याचार अन् खून करून झाला पसार; टप्प्यात येताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर- नेवासा तालुक्यातील सोनईसह शेवगाव पोलीस ठाण्यात खून व बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सोनई पोलिसांनी नेवासा तालुक्यातील मोरयाचिंचोंरे येथून काल रविवारी अटक केली. आरोपी रवींद्र फुलचंद भोसले (वय 38, रा.मोरयाचिंचोरे ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की खून व बलात्कारातील फरार आरोपी रवींद्र फुलचंद भोसले हा मोरयाचिंचोरे येथे येणार आहे. या माहितीवरून सोनई पोलीस पथकाने सापळा रचत अटक केली.
या आरोपीवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र नं. 14/2022 भादवि कलम 376 (2) (आय) (एन) 506, 34 सह पोक्सो कायदा कलम 6, 10, 12 प्रमाणे, शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 55/2022 भारतीय दंड विधान कलम 302, सोनई पोलीस ठाण्यात गु र नं 34/2020 भादवी कलम 324, सोनई पोलीस ठाण्यात गु र नं 80/2018 भादिंंव कलम 399, 402 व गु र नं 22/2014 भादवि कलम 354 प्रमाणे गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यात आरोपी फरार होता.
आरोपी रवींद्र फुलचंद भोसले याच्यावर 2014 मध्ये सोनई पोलीस ठाणे हद्दीत विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर 2018 मध्ये सोनईतच 399 व 402 कलमान्वये गुन्हा दाखल झाला. 2020 मध्ये एक मारहाणीचा, 2022 मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा तर शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा असे एकूण 5 गुन्हे दाखल झालेले आहेत. तो आतापर्यंत फरार होता.