हॉटेलमध्ये मुक्काम केला अन् भाडे बुडवून झाले पसार; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर- शहरातील आयरीएस हॉटेलच्या रूमचे भाडे आज देतो, उद्या देतो असे म्हणून दोघांनी 55 हजार 940 रूपये भाडे न देता फसवणुक केली. हॉटेलचे मॅनेजर फिरोज अब्दुल रज्जाक मोघल (वय 36 रा. निंबोडी ता. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून विघश्नेश शैंलेंद्र पुट्टा, सविता शैलेंद्र पुट्टा (दोघे रा. नारायण निवास, नागपाडा, कमाठीपुरा, मुंबई) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 13 ऑक्टोबर, 2022 रोजी ही घटना घडली असून सोमवार, 9 जानेवारी 2023 रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे.
विघश्नेश व सविता हे दोघे आयरीएस हॉटेलच्या रूममध्ये भाडोत्री राहिले होते. त्यांचे रूमचे भाडे 55 हजार 940 रूपये झाले होते. दरम्यान हॉटेलचे मॅनेजर फिरोज अब्दुल रज्जाक मोघल यांनी त्यांच्याकडे भाड्याची मागणी केली असता त्यांनी इलेक्ट्रॉनिक बनावट खोटा दस्तऐजव तयार करून त्यांच्या मोबाईल नंबर वरून फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर पाठवून हॉटेल रूमचे भाडे दिल्याचा बनाव केला.
फिर्यादीचा हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी रूम भाड्याची मागणी केली असता विघश्नेश व सविता हे फिर्यादीला,‘आज देतो, उद्या देतो’, असे म्हणून आजपर्यंत भाडे न दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार व्ही.बी. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.