जिल्हा पोलीस भरतीला उत्तेजक द्रव्याची बाधा; तरूणाकडे आढळलं तीन सिरिज

अहमदनगर- पोलीस भरती प्रक्रियेत शिपाई पदासाठी चाचणी सुरू असताना उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या संशयावरून एका तरूणाला ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. दरम्यान, गुरूवारी शिपाई पदासाठी पुरूषांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. आज (शुक्रवार) व उद्या (शनिवार) महिला-मुलींची चाचणी होणार आहे.
शिपाई पदासाठी 4 जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. 11 हजार 278 जणांचे अर्ज आले होते. त्यातील पात्र ठरलेल्या पाच हजार 48 जणांची चाचणी झाली. गुरूवारी एक हजार 160 उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 820 जण हजर होते. तर 340 जण गैरहजर होते. 67 जणांना तपासणीमध्ये अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित 753 जणांची चाचणी घेण्यात आली. आजपासून महिला उमेदवारांची चाचणी होणार आहे. दोन दिवस रोज एक हजार उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण होणार आहे.
दरम्यान, गुरूवारी मैदानी चाचणी सुरू असताना अरणगाव (ता. नगर) येथे धावण्याच्या चाचणीवेळी एका उमेदवाराने उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या संशयावरून त्याची तपासणी करण्यात आली. नाशिक येथे त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
…………….
‘तो’ तरूण मालेगावचा
1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात व्यवस्था केलेली आहे. पोलीस मुख्यालयातून अरणगाव येथे जाणार्या प्रत्येक उमेदवाराची तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान मालेगाव येथील तरूणाच्या बॅगमध्ये उत्तेजक द्रव्याच्या तीन सिरीज व इंजेक्शन आढळून आले. दरम्यान पोलिसांनी त्याचे लेखी घेतल्यानंतर त्याची मैदानी चाचणी घेतली. चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.