अहमदनगर

गर्भपात गोळ्यांचा साठा; ‘या’ कंपनीसह मेडिकल एजन्सी चालकाविरूध्द गुन्हा

पंचकुला (हरीयाणा) येथील आयव्हीए हेल्थ केअर या कंपनीतून अहमदनगर शहरातील श्रीराम एजन्सीकडे गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा आल्याचे तपासात समोर आले आहे.

एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा आढळून आला होता. 5 मे रोजी हा साठा औषध प्रशासन व एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला होता.

या प्रकरणी आज (मंगळवार) रात्री श्रीराम एजन्सीचे मालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. टीव्ही सेंटर, सावेडी) आणि आयव्हीए हेल्थ केअर कंपनीच्या संचालक मंडळाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त ज्ञानेश्‍वर दरंदले यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींविरोधात भादंवि 34, 420, 468, 471 व औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत कलम 18 (सी) 18 (ए) व 22 (सीसीए) शिक्षा कलम 27 (बी) व 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 मे, 2022 रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने गर्भपाताच्या गाळ्यांचा साठा जप्त केला होता.

सात लाख 66 हजार 440 रूपये किंमतीचा साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा होता. बिल मात्र दुसर्‍या गोळ्यांच्या नावाचे असल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे.

यामुळे पोलीस व औषध प्रशासनाने तो साठा जप्त करून तपास सुरू केला होता. त्यातील नमूने औरंगाबाद येथील शासकीय लॅबोरेटरीकडे पाठविले आहेत.

तपासादरम्यान श्रीराम एजन्सीचे मालक नितीन बोठे हा गर्भपाताच्या औषध विक्रीचा विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे दिसुन आले. याबाबत त्याला 9 मे, 2022 रोजी नोटीस देऊन खुलासा करण्यास सांगितले गेले होते.

श्रीराम एजन्सी आंनद बाजार, पटवर्धन चौक या जागेत कार्यरत नसुन त्याऐवजी ते त्यांचे राहत्या घरातुन 30 शिवनेरी पंकज कॉलनी टी.व्ही.सेंटर या जागेतु विनापरवाना औषधाची खरेदी व विक्री करत असल्याचे कळविले आहे.

सर्व बाबी विचारात घेता गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषधाचा काळाबाजार करणारे खुप मोठे रॅकेट असण्याचे बोठे याने मान्य केले. परंतु औषधाचा साठा त्यांचा नसल्याचे त्याने सांगितले. यावरून तो तपास कामात सहकार्य करत नसल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणी सखोल तपास होणे आवश्यक असल्याने आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button