सामाजिक अशांतता निर्माण केल्यास कठोर कारवाई; ‘या’ वरिष्ठ अधिकार्यांनी दिला इशारा

सध्या संपूर्ण राज्यभरात भोंगे, झेंडा वाद यासह विविध मुद्द्यांवरून तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान रमजान, अक्षय तृतीया यासारखे सण येत्या काही दिवसात साजरे होत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी अहमदनगर शहरातील विविध समाजांचे प्रतिनिधी, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह पोलीस अधिकारी, संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सध्या तरूणांची माथी भडकावण्याचे काम सुरू आहे. यातून सामाजिक अशांतता निर्माण होत आहे.
तरूणांची माथी भडकवली जात असल्याने अनुचित घटना घडत आहे. या घटनांमधून तरूणांचे आयुष्य उध्दवस्त होते. मात्र असे तरूण रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांची माथी भडकावणारे कोणीही मदतीला येत नाहीत.
वर्षानुवर्षे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्याचा विचार सर्वांनी करावा, असे आव्हान नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केले. दरम्यान अहमदनगर शहर शांत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
जोपर्यंत तुम्ही सन्मानाने वागाल, तोपर्यंत आम्ही सन्मान देऊ. तुम्ही चुकीचे वागलात, तर आम्ही त्यापेक्षाही कठोर कारवाई करू, अशा शब्दात महानिरीक्षक शेखर पाटील यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे.