वाळू आणि दारू पोलिसांच्या टार्गेटवर; एसपींनी दिले कारवाईचे आदेश

अहमदनगर- 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या जागी राकेश ओला यांची नियुक्त झाली. त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे राकेश ओला यांनी हाती घेताच त्यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांना दिले आहेत. यामुळे अवैध धंद्याच्या माध्यमातून दहशत पसरविणार्या व आर्थिकदृष्ट्या ‘गब्बर’ झालेल्यांचे धाबे दणाणले आहेत. अधीक्षक ओला यांनी अवैध वाळू व दारू धंद्यावर कारवाईसाठी एलसीबीचे तीन पथके नियुक्त केली आहेत.
अधीक्षक ओला यांनी शनिवार, 29 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस दलातील अधिकार्यांची मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक (श्रीरापूर) स्वाती भोर यांच्यासह जिल्हातील पोलीस उपअधीक्षक, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. अवैधरित्या सुरू असलेला वाळू उपसा, गोमांस विक्री, मटका, जुगार, अवैध दारू अशा धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत.
एखाद्या पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्यास व तसे निदर्शनास आल्यास संबंधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांवर खात्याअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान अधीक्षक ओला यांनी अवैध वाळू उपसा व अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके स्थापन केली आहेत. अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी सहाय्यक फौजदार यांच्या नेतृत्वाखाली सात अंमलदाराचे एक पथक कार्यरत करण्यात आले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाईसाठी पोलीस हवालदार यांच्या नेतृत्वाखाली सहा अंमलदार व दक्षिण नगर जिल्ह्यासाठी पोलीस हवालदारच्या नेतृत्वाखाली पाच अंमलदारांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पथके स्थापन होताच त्यांनी रविवारपासून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. कारवाई सुरू झाल्याने अवैध धंदा करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यावर आता कारवाई केली जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून अधीक्षक ओला यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.