अहमदनगर

गंभीर गुन्ह्यात 22 वर्षांपासून फरार आरोपी विकायचा दारू; एलसीबीने ठोकल्या बेड्या

13 गंभीर गुन्हे दाखल असलेला व पोलिसांची नजर चुकवून 22 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तो माजलगाव (जि. बीड) परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यावसाय करत होता.

उत्तम काशिनाथ गायकवाड (रा. माजलगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द नगर, पुणे, जालना व बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात सन 1999 साली दाखल गुन्ह्यात 22 वर्षांपासून तो फरार होता. शेवगावमध्ये दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल होता.

यात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखाच्या विशेष पथकाला वॉरंटची तत्काळ बजावणी करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सुचनेनुसार पथकाने आरोपी गायकवाड याला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील केसापूर कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले.

पथकाने तीन दिवस त्याच्या वास्तव्याची माहिती घेतली. तो अवैध दारूचा व्यवसाय करत असून वारंवार ठिकाण बदलत होता. पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपी गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, मोक्का व दारूबंदी असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. माजलगाव शहर पोलीस ठाण्याने सन 2017 मध्ये मोक्का कायद्यातंर्गत त्याच्यावर कारवाई केलेली आहे.p

Related Articles

Leave a Reply

Back to top button