अहमदनगर

नववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली

अहमदनगर- पाच ते सहा दिवसांपूर्वी विवाह करून आलेल्या तरुणीने दुसर्‍याच दिवशी सुमारे एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घडली आहे. या घटनेची उंबरे परिसरात चर्चा सुरू आहे.

 

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील एका दलालाने तब्बल एक लाख रुपये कमीशन घेऊन उंबरे गावातील एका तरुणाचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका तरुणीशी पाच ते सहा दिवसांपूर्वी लावून दिला होता.

 

नववधूला विवाह सोहळ्यात सुमारे लाखभर रुपयांचे सोन्याचे दागीने वरपक्षाकडून घालण्यात आले होते. हा विवाह हिंदू पद्धतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. विवाह सोहळ्यात वर्‍हाडी मंडळींना पाची पक्वान्नाचे भोजन देण्यात आले.

 

विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर नववधू ही वराच्या घरी म्हणजे उंबरे या ठिकाणी आली. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी नववधू व नवरदेव दोघे उंबरे परिसरातील काही मंदिरात गेले आणि जोडीने देवदर्शन घेतले. देवदर्शन करुन हे नविन जोडपे पुन्हा घरी परतले.

 

त्याच दिवशी सायंकाळच्या दरम्यान नववधू ही वराच्या घरातून अचानकपणे अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह बेपत्ता झाल्याचे दिसून आले. नववधूच्या सासरकडील लोकांनी तीचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर त्यांनी विवाह जुळवून देणार्‍या मध्यस्थीला फोन करून नववधू बेपत्ता झाल्याची खबर दिली.

 

त्या मध्यस्थीने तीचे माहेर असलेल्या वैजापूर येथील तीच्या नातेवाईकांना फोन करून चौकशी केली. त्यावेळी ती नववधू माहेरी सुखरूप पोहचल्याचे समजले. या घटनेतील नवरदेव व त्याच्या घरच्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मध्यस्थी करणार्‍या दलालाकडे कमीशन दिल्याचे एक लाख रुपये व नवरीला घातलेले दागीने परत करण्याची मागणी केली.

 

जर रक्कम व दागीने दिले नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची उंबरे परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे. राहुरी तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये बाहेरील जिल्ह्यातील मुलींचे लग्न लावून देण्यासाठी अनेक दलाल मध्यस्थी करून हा व्यवहार करतात. यामधील मुलींचे अनेक लग्न झाल्याचे समजते. लग्न केल्यानंतर त्या मुली दागीने घेऊन पोबारा करतात.

 

ज्या मुलांची लग्न करून फसवणूक होते. ते पण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास तयार नसतात. अनेक गरीब कुटुंबांची आपल्या मुलांचे लग्न व्हावे, अशी इच्छा असते. याचाच फायदा दलाल घेऊन त्यांना गळ घालतात. या जाळ्यात अनेक गोरगरीब फसले जातात. खरंतर पोलीस प्रशासनाने अशा दलालांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त केला तर अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button