भावाने भावावर केला कैचीने हल्ला; इतर दोघांकडून मारहाण

तरूणावर कैचीने वार करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. रितेश दिलीप लसगरे (वय 30 रा. मोची गल्ली, तोफखाना) असे जखमी तरूणाचे नाव आहेत. गुरूवारी रात्री साडेआठ वाजता मोची गल्लीत ही घटना घडली.
रितेश यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रितेश यांच्या भावासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद दिलीप लसगरे, गणेश शामलाल लव्हाळे, आलोक संतोष भवरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गुरूवारी रात्री रितेश हे घरी जात असताना हर्षद व इतर दोघांनी त्यांना आवाज दिला. ‘तु आमच्या विषयी वाईट साईट व अपशब्द इतर लोकांजवळ का बोलतो’, असे म्हणत तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केेली. रितेश घरी गेल्यानंतर आरोपी त्याच्या घरी गेले.
रितेशला घराच्या बाहेर बोलून घेत हर्षदने त्याच्यावर कैचीने वार केले. इतर दोघांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या रितेशच्या पत्नीला आरोपींनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.