गोमांस विक्रीची खबर नियंत्रण कक्षाला मिळाली आणि…

गोमांसाची वाहतूक केली जाणारा टेम्पो नागरदेवळे (ता. नगर) येथील प्रितम हॉटेलसमोर उभा असल्याची खबर नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून 60 हजार रूपये किंमतीचे 500 किलो गोमांस व पाच लाख रूपये किंमतीचा आयशर टेम्पो असा पाच लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिंगार कॅम्प पोलिसांनी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता नागरदेवळे (ता. नगर) येथे ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस नाईक रघुनाथ कुलांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोमांसाची वाहतूक करणारा इरफान इकबाल शेख (वय 25 रा. घासगल्ली, कोठला, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता नियंत्रण कक्षात फोन आला की, नागरदेवळे शिवारात हॉटेल प्रितमसमोर आयशर टेम्पो उभा असून त्यातून गोमांसाची वाहतूक केली जाणार आहे.
अशी खबर मिळताच नियंत्रण कक्षाकडून भिंगार पोलिसांना कारवाई संदर्भात आदेश देण्यात आले. पथकाने पावणे बारा वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता आयशर टेम्पोमध्ये गोमांस आढळून आला.पोलिसांनी ते जप्त केले असून इरफान शेख याला ताब्यात घेतले आहे.