अहमदनगर

महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर- महिलेचा विनयभंग केल्याबद्दल विशेष न्यायालय तथा जिल्हा न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी आरोपीला भा.द.वि. कलम 354 नुसार दोषी धरून एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. कैलास दत्तात्रय गर्जे (रा. गर्जेवस्ती, पाडळी, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदर सत्र खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. सी. डी. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

 

सदर घटनेची थोडक्यात हकिगत अशी की, पीडित महिलेचा शेतात 29 जून, 2018 रोजी बाजरीचे पेरणीचे काम करण्याकरीता कैलास दत्तात्रय गर्जे हा ट्रॅक्टर घेऊन आला होता. पेरणी पूर्ण झालेनंतर महिलेने त्यास पेरणीचे किती पैसे द्यायचे, असे विचारले असता,‘तीन हजार रूपये’, असे त्याने सांगितले; पण,‘मला तुझ्या कडून पैसे नको’, असे म्हणून त्याने महिलेचा विनयभंग करून तिस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत दमदाटी केली. तसेच सदर प्रकाराबाबत महिलेचा भाऊ व मुलगा यांनी कैलास गर्जे यास विचारणा केली असता त्याने त्यांना देखील दमदाटी केली.

 

म्हणून कैलास गर्जे याचे विरूध्द पीडित महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भा.द.वि. कलम 354, 506 सह अनसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, सहायक पोलीस निरीक्षक वाय.एस. राक्षे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये एकुण चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने न्यायालयासमोर सादर केलेला पुरावा, सरकारी पक्षाचे साक्षीदारांचा साक्षी पुरावा, तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सदर खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार एम.ए. थोरात व ए.आर. भिंगारदिवे यांनी सहाकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button