अहमदनगर

राहुरीतील ‘त्या’ इसमाचा मृत्यू अद्याप गुलदस्त्यात…अहवालानंतर होणार खुलासा

राहुरी शहरातील हाबीब इनामदार यांना चक्कर येऊन ते खाली पडले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी परस्परांवर आरोप केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, हाबीब बाबू इनामदार (वय 42 वर्षे, रा. मुलनमाथा राहुरी) यांच्या निधनानंतर रूग्णालय परिसरात हाबीब यांचे मित्र व नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार राहुरी पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

दरम्यान इनामदार हे चहाविक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दि.2 एप्रिल रोजी रात्री हाबीब इनामदार यांचे मुलनमाथा येथे काहीतरी भांडण झाले. या भांडणात त्यांच्या छातीवर मार लागून ते मयत झाले. किंवा त्यांना कोणीतरी औषध पाजले, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

दुसर्‍या दिवशी सकाळी इनामदार यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांचा मृत्यू अहवाल राखून ठेवला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच इनामदार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल. असे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button