अहमदनगरताज्या बातम्या

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली कार्यालयाची झाडाझडती

Ahmednagar News : जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हेमलता बढे यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयासह सर्व तालुक्‍यात असलेल्या पुरवठा निरीक्षक, नायब तहसीलदार आणि कर्मचार्‍यांची बैठक घेत पुरवठा विभागाचा आढावा सुरू केला आहे.

‘प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा, तक्रारींचे निरसन करीत वेळेत वेळेत काम करा, हायगय करू नका,’ असे निर्देश पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे दिले आहेत. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम देखील उपस्थित होते.

महसूल विभागात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्यानुसार महसूल विभागातील महत्त्वाच्या खात्यात खांदेपालटाची प्रक्रिया सुरू आहे.

महसूल व वन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या बदली आदेशानुसार तत्कालीन जयश्री माळी यांच्या जागी हेमलता बढे यांची जिल्हा पुरवठा अधिकारी पदी नियुक्‍ती करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बढे यांनी पुरवठा विभागाची झाडाझडती सुरू केली आहे.

बुधवार दि.१० मे रोजी सकाळी दहा वाजताच ‘डीएसओ बढे आपल्या दालनात दाखल झाल्या. उशिरा कार्यालयात आलेल्या कर्मचार्‍यांना विचारणा करीत लेटमार्क नोंदवला. त्यानंतर आपल्या दालनात त्यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.

कर्मचार्‍यांची ही बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल सभागृहात हेमलता बढे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांच्या समवेत जिल्ह्याच्या चौदाही तालुक्‍यातील पुरवठा निरीक्षक, महसूल नायब तहसीलदार यांच्या समवेत प्रदीर्घ बैठक घेतली.

दुपारी अडीच वाजता सुरु झालेली हि बैठक साडेपाच वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत अन्नधान्य वितरण, आनंदाचा शिधा, शासन आपल्या दारी योजनेतील विभागाचा इष्टांक, शिवभोजन, गोडाऊन विषयक बाबी, ऑनलाइन विषयक प्रणालीची कामे आदी जवळपास ३०-३५ मुद्यांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी डीएसओ बढे म्हणाल्या, ‘सर्वांनी जबाबदारी निश्चित असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा.दिरंगाई करू नका. पुरवठा विभागाचे काम चांगलेच हवे.

वरिष्ठ पातळीवरील बैठकीत दिरंगाईमुळे जाब विचारला जाणे योग्य नाही. वेळेत काम करणे हा आपला स्वभाव आहे. तुम्ही सर्वजण देखील ही बाब अंगीकारा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button