माजी महापौरांची तरुणाला धमकी, गुन्हा दाखल !

सावेडी गावठाण येथे खासगी शेतातून रस्ता करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकळे व इतरांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वैभव कैलास जाधव (वय ३०, रा. सावेडी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे,
२ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जाधव यांच्या शेतातून बाबासाहेब सोन्याबापू वाकळे (रा. सावेडी गाव), पुष्कर कुलकर्णी (पूर्ण नाव नाही, रा. बालिकाश्रम रोड), मारुती जाधव (पूर्ण नाव नाही, रा. केडगाव) हे रस्ता तयार करीत होते.
त्यावेळी जाधव यांनी त्यांच्या शेतातून रस्ता करण्यास मज्जाव केला.. याचा राग आल्याने आरोपींनी जाधव यास शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.
जाधव यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब वाकळे, पुष्कर कुलकर्णी, मारुती जाधव यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.