कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सरकार करणार मदत ! अर्ज कुठे करावा ? आवश्यक कागदपत्रे ? वाचा संपूर्ण माहिती
मात्र क्षेत्रफळाने सर्वात मोठा व मोठी लोकसंख्या असूनही योजनेचे नगरमध्ये केवळ १९५ लाभार्थी आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील अद्यापही अनेकजण योजनेपासून वंचित आहेत

दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील कर्ता व्यक्ती म्हणजेच कमावती स्त्री किंवा पुरुष अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील वारसाला आर्थिक स्वरूपात सहायता म्हणून एकरकमी २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते;
मात्र क्षेत्रफळाने सर्वात मोठा व मोठी लोकसंख्या असूनही योजनेचे नगरमध्ये केवळ १९५ लाभार्थी आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील अद्यापही अनेकजण योजनेपासून वंचित आहेत
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्ता व्यक्ती ज्याचे वय १८ ते ५९ वर्षे आहे, अशी व्यक्ती मयत झाली तर हे अनुदान दिले जाते. मयताचा मुलगा, मुलगी यापैकी एकाला अर्थसाहाय्य दिले जाते. ही केंद्र सरकारची योजना आहे;
मात्र अद्यापही या योजनेविषयी लोकांना फारशी माहिती नाही. अर्ज कुठे करायचा, त्याची पात्रता निकष काय हे लाभार्थीपर्यंत पोहोचू शकलेले नाही. कोविड काळात अनेक कुटुंबांनी कर्ता पुरुष अथवा स्त्री गमावलेली आहे; मात्र त्यांच्यापर्यंत योजना पोहोचू शकलेली नाही.
कर्ती स्त्री गमावली तरीही लाभ
कुटुंबातील कमावती व्यक्ती गमावल्यास वारसांना योजनेचा लाभ दिला जातो. त्यामुळे कमावता पुरुष अथवा स्त्री या दोघांपैकी कुणाचाही मृत्यू झाल्यास वारसांना अर्ज करता येऊ शकतो.
जिल्ह्यात १९५ लाभार्थी
नगर जिल्ह्यामध्ये योजनेचे १९५ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये त्याची विभागणी केल्यास प्रत्येक तालुक्यात केवळ १३ लाभार्थी आहेत.
योजनेसाठी २००२च्या दारिद्र्यरेषेच्या यादीत नाव असणे बंधनकारक आहे. अनेक पात्र लोकांचा या यादीत समावेश होऊ शकलेला नाही. सरकारने त्याचे निकष बदलणे गरजेचे आहे. तरच गरजूंना लाभ मिळू शकेल. -राजेंद्र निंबाळकर, श्रावणबाळ मातापिता सेवासंघ, सोनई
अर्ज कुठे करावा ?
■कुटुंबातीलप्रमुखाचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबातील वारसाने तलाठी, तहसील कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वर्षांच्या आत अर्ज करावयाचा आहे.
आवश्यक कागदपत्रे ?
अर्जदाराने आधारकार्ड, रेशनकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, मृत्यूचे प्रमाणपत्र, वारसाचे प्रमाणपत्र, सत्यप्रत प्रतिज्ञापत्र, अर्ज ही कागदपत्रे जमा करावयाची असतात.