ग्रामपंचायत मतदानासाठी आले अन् पाच तोळे गमावून बसले

अहमदनगर- एक जोडपं पुणे येथून मुळ गावी ग्रामपंचायत मतदानासाठी आले होते. ते पुन्हा पुणे येथे जात असताना त्यांच्याकडील सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले.
येथील पुणे बस स्थानकावर महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून यासंदर्भात सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मीरा सुर्यकांत गुंड (वय 50 रा. चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे, मुळ रा. वाघळुज ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.
मीरा व त्यांचे पती सुर्यकांत हे दोघे पुणे येथे खासगी नोकरी करतात. ते रविवारी सकाळी ग्रामपंचायत मतदानासाठी त्यांच्या मुळ गावी वाघळुज येथे गेले होते. मतदान झाल्यानंतर ते पुणे येथे जाण्यासाठी नगर बसमध्ये बसले. सायंकाळी येथील पुणे बस स्थानकावर उतरले असता त्यांच्याकडील पर्स व बॅग सुरक्षित होती.
ते दोघे सायंकाळी पावणे सहा वाजता पुणे बस स्थानकावरून पुणे येथे जाणार्या बसमध्ये बसले. त्यांनी तिकीट काढण्यासाठी पर्स पाहिली असता त्यांना पर्सची चैन उघडी दिसली. पर्समधील सोन्याचे दागिने त्यांना दिसले नाही. कोणीतरी त्यांच्या पर्समधील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व 18 ग्रॅमचे मिनी गंठण चोरून नेल्याचे त्यांची खात्री झाली. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.