अहमदनगर

चक्क मटका बुकीच्या डोक्याला लावला कट्टा आणि पळविले पैसे

अहमदनगर- मटका घेत असलेल्या मटका बुकीच्या डोक्याला कट्टा लावून सहा हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना भरदुपारी पुणतांबा (ता. राहाता) येथील स्टेशनरोडच्या पाठीमागे खंडोबा मंदिराजवळ घडली.

 

दोन दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यानी मटका घेणार्‍या खोलीत प्रवेश केला. त्यांना कट्ट्याचा धाक दाखवून रोख रक्कम हिसकावून घेतली. मटका बुकी हे दोघेही चांगदेवनगर येथील आहेत.

 

चोरट्यांनी जाताना दोघांचेही मोबाईल हिसकावून घेतले व आम्ही श्रीरामपूर येथील एका मोठ्या टोळीची माणसे आहोत. कुठे तक्रार केली तर गाठ आमच्याशी आहे. आमच्या नादी लागू नका. असा दम दिला. दिवसा ढवळ्या घडलेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

 

पुणतांबा गावात 15 दिवसांपूर्वी येथील कोल्हापूर पद्धतीच्या वसंत बंधार्‍याच्या 34 लाख रुपये किमतीच्या 301 लोखंडी फळ्या चोरीस गेलेल्या आहेत. त्याचा तपास अद्यापही सुरू असून मुद्देमाल अद्यापही मिळालेला नाही. गावात नेहमीच भुरट्या चोर्‍या होतात. त्याचाही तपास लागलेला नाही. त्यातच चोरट्यांनी दिवसा ढवळ्या कट्टा लावून रोकड पळविली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 

विशेष म्हणजे याबाबत मटका बुकींनी पोलीस ठाण्यात साधी तक्रार सुद्धा दाखल केली नाही. पुणतांबा गावात गुंडगिरीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button