वाहनातून डिझेल चोरीचा उद्योग; टोळी गजाआड

अहमदनगर- रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनातून डिझेल चोरी करणार्या रितेश वसंत सदाफळ (रा. गणेशनगर ता. राहाता), ऋतुंजय उर्फ अमोल अविनाश कुंदे (रा. एकरूखा ता. राहाता) व अजय राजू भोसले (रा. गणेशनगर ता. राहाता) यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
नवाज फकिर महंमद शेख (वय 35 रा. हसनापुर, ता. राहाता) यांची लोणी (ता. राहाता) येथील भारत पेट्रोलपंपासमोर दोस्ती गॅरेज समोर दुरूस्तीकरीता ट्रक (एमएच 14 ईएम 9547) ही उभी करून ठेवली असता कारमधुन आलेल्या अज्ञात तिघांनी त्यांचे ट्रकचे टाकीचे लॉक तोडून ट्रकमधील 150 लीटर डिझेल चोरी केले होते. तसेच इतर बाजुला उभ्या असलेल्या वाहनांतून 400 लीटर डिझेल चोरून नेले होते. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, रितेश वसंत सदाफळ, अमोल अविनाश कुंदे, अजय राजू भोसले हे एका पांढरे रंगाचे स्विफ्ट कारने चोरी केलेले डिझेलची विक्री करण्यासाठी अहमदनगरकडे येत आहेत. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सदर माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना सांगून पथकासह जाऊन खात्री करून कारवाई करणेबाबतचे आदेश दिले.
पथकाने सदर कार आडवून त्यामधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे रितेश वसंत सदाफळ (रा. गणेशनगर, ता. राहाता), ऋतुंजय उर्फ अमोल अविनाश कुंदे (रा. एकरूखा ता. राहाता), अजय राजू भोसले (रा. गणेशनगर ता. राहाता) अशी असल्याची सांगितली. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचे कारमध्ये व रामपूरवाडी शिवारातील हॉटेल साई पवन येथे ठेवलेले 550 लीटर डिझेल, डिझेल काढण्यासाठी लागणारे साहित्य व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकुण चार लाख 99 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना पुढील कारवाईकरीता लोणी पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे.