‘त्या’ तरूणाच्या खूनींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

भजे प्लेटच्या किंमतीवरून झालेल्या वादात तरूणाचा खून करणार्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने 3 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पप्पु ऊर्फ प्रविण रमेश कांबळे (वय 35 रा. दत्त मंदिराजवळ, बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अमोल बाबासाहेब सोनवणे (रा. वडगाव गुप्ता रोड, नवनागापूर), पुरूषोत्तम कुमार गुप्ता, अरूण नारद शहा, संकेत विठ्ठल सोमवंशी (तिघे रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) व बबड्या ऊर्फ बाबासाहेब केरू गव्हाणे (रा. रोकडे मळा, नवनागापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांचा साथीदार अमोल भाऊसाहेब साळवे (रा. वडगाव गुप्ता रोड, नवनागापूर) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी शोभा रमेश कांबळे (वय 55) यांनी फिर्याद दिलेली आहे.
प्रविण कांबळे हा एमआयडीसीत हमालीचे काम करायचा. मंगळवारी दुपारी प्रविण व त्याचा मित्र अमोल बोर्डे (रा. निंबळक ता. नगर) अरूण शहा याच्या नवनागापूर येथील रेणुका माता वडापाव सेंटरवर गेले होते.
तेथे त्यांच्यात 15 रूपयाची भजे प्लेट 20 रूपयाला लावल्यावरून वाद झाला होता. सहा जणांनी त्यांच्याकडील लोखंडी गज, कुर्हाड, लाकडी दांडक्याने प्रविला मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रविणला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्रविणवर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलिसांनी पाच आरोपींना तत्काळ अटक केली. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता 3 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.