एसपींनी आदेश देताच एलसीबीने धडाकाच लावला; 128 ठिकाणी हातभट्टीवर छापे

अहमदनगर – जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या विशेष माहिमेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील 128 अवैध दारू व गावठी हातभट्टी अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.
10 दिवसांच्या मोहिमेत 128 आरोपींविरूध्द कारवाई करत 11 लाख 88 हजार 430 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना 21 ते 30 जून या कालावधीत अवैध दारूविरूध्द विशेष मोहिम राबविण्याचे व कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व अंमलदार यांनी जिल्ह्यातील अवैध दारू, गावठी हातभट्टयांचा शोध घेवून 128 ठिकाणी छापे टाकले. यात एकूण 11 लाख 88 हजार 430 रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला आहे. तसेच 128 आरोपींविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.