हॉटेलचे मॅनेजर मध्यरात्री घराकडे निघाले, रस्त्यात त्यांच्यावर खूनी…

अहमदनगर- ड्यूटी संपल्यानंतर रूमकडे जाणार्या हॉटेल रेडीअन्सच्या मॅनेजर प्रल्हाद परिमल चौधरी (वय 34 रा. बुधबुध, ता. मानका, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल, हल्ली रा. वरवंडी गल्ली, माळीवाडा) यांच्यावर चॉपरने खुनी हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता माळीवाडा परिसरातील हॉटेल लकी व हॉटेल शिवसंग्रामच्या मध्यभागी रस्त्यावर ही घटना घडली.
चौधरी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दया बोराडे व त्याच्यासोबतचे दोन अनोळखी यांच्याविरूध्द जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
विशाल दत्तात्रय रासकोंडा (रा. वरवंडे गल्ली, माळीवाड) यांचे स्वातिक चौकात रेडीअन्स हॉटेल आहे. तेथे चौधरी हे मॅनेजरचे काम करतात. त्यांच्यासोबत शरीफ माजिद शेख व माजिदुल फैदुल करीम (दोघे रा. पश्चिम बंगाल) हे काम करतात. ते तिघे माळीवाडा परिसरातील रूमवर राहतात. रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर मॅनेजर चौधरी व त्यांच्यासोबत शरीफ शेख व माजिदुल फैदुल करीम रूमवर जात असताना त्यांना हॉटेल लकी ते हॉटेल शिवसंग्रामच्या मध्ये रस्त्यावर गाठले.
त्यातील एक जण चौधरींच्या जवळ आला व चॉपर दाखवून म्हणाला,‘माझे नाव दया बोराडे व या परिसरातील मी डॉन आहे, तुझा मोबाईल व पैसे मला दे नाहीतर तुला जीवे ठार मारू‘, असे म्हटल्याने चौधरींचे साथीदार बाजूला झाले. चौधरी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांच्यावर चॉपरने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चौधरी यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील लोक मदतीसाठी आले, तो पर्यंत हल्ला करणारे तिघे पसार झाले होते. पोलीस अधिक तपास करीत आहे.