कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला वाळू तस्कराने धु धु धुतला…मात्र आरोपीविरुद्ध कारवाई नाही

जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू तस्करांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. दरदिवशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होत आहे.
यातच खुद्द महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वाळू तस्करांच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील एका मंडलाअधिकार्याला वाळूतस्करांनी बेदम मारहाण केली आहे.
मात्र राजकीय पाठबळ असलेल्या या वाळूतस्करावर काही देखील कारवाई करण्यात आली नाही. यामुळे खुद्द मंत्र्यांच्या तालुक्यात असा गैरप्रकार होत असेल तर तस्करांची मुजोरी किती वाढली आहे, हेच या घटनेवरून सिद्ध होऊ लागले आहे.
दरम्यान या घटनेने मात्र तालुक्यात या वाळू तस्करांची एक मोठी दहशत निर्माण झाली आहे. अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उपसा सुरु असून या वाहनांकडे महसूल करणचारी सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.
वाळूतस्करांनी याचा चांगलाच फायदा घेतला असून त्यांची तालुक्यात मुजोरी वाढली आहे. नुकतेच तालुक्यातील कर्हे घाटातून एका डंपर मधून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती एका मंडल अधिकार्यांना समजली.
या अधिकार्याने या घाटामध्ये डंपरला अडविले. याठिकाणी काही वाळूतस्कर व या अधिकार्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. व त्यानंतर वाळूतस्करांनी या अधिकार्याना चांगलाच चोप दिला.
त्यानंतर यातील काही वाळू तस्करांनी एका राजकीय पदाधिकार्यांच्या घरी जाऊन त्यांना हा प्रकार सांगितला. या पदाधिकार्यांनी घटनेचे सर्व व्हिडिओ डिलीट करा असे आदेश दिले.
नेत्याने मध्यस्थी केल्याने या प्रकरणावर पडदा पडला. मारहाण झालेला हा अधिकारी कोण व त्याला मारहाण करणारे वाळू तस्कर कोण याबाबत उलटसुलट चर्चा होत होती.
महसूल खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्याने या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज असतानाही त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.