तलाठी, कोतवाल यांच्यावर हल्ला करणारा पुण्यात पकडला

खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा निर्माण केलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपी दीपक भानुदास आघाव (वय 25 रा. बारागाव नांदूर, नवीन गावठाण ता. राहुरी) याला हडपसर (पुणे) येथून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
19 ऑगस्ट, 2019 रोजी कामगार तलाठी संदीप नवनाथराव नेहरकर (वय 25) हे कोतवाल बाचकर यांचेसह नवीन गावठाण, बारागाव नांदुर येथे कार्यालयीन कामासाठी जात असताना दीपक आघाव हातात फावडे घेऊन गाडीसमोर उभा राहिला.
‘तू आम्हाला मुरूम का वाहून देत नाही’, असे म्हणत फावड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तलाठी नेहरकर व कोतवाल बाचकर यांना जखमी केले होते.
तसेच दीपकचे वडिल भानुदास आघाव व भाऊ सागर आघाव यांनीही मारहाण केली होती. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, शंंकर चौधरी, संदीप लोढे, रवी सोनटक्के, रोहित यमुल, सागर ससाणे, रणजित जाधव, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.