जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात होणार दुपटीने वाढ; कारण…

अहमदनगर- सुरुवातीच्या काळात चार हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती. दोन महिन्यांपासून दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत किमान 5 हजार 600 व कमाल 6 हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. शेतकर्यांना सोयाबीनचे आणखी भाव वाढण्याची अपेक्षा असून शेतकरी सोयाबीन बाजारात आणत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातच व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून त्याची साठेबाजी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतर प्रत्यक्षात बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री होत असते. मात्र सध्यातरी पाहिजे त्या प्रमाणात आवक नसल्याने तसेच व्यापार्यांनी साठेबाजी सुरू केल्याची शंका आल्याने तेल कंपन्या आता सोयाबीन खरेदीसाठी बाजारात उतरल्या आहेत. तर बियाणे कंपन्या देखील तयारीला लागल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. शेतातील सोयाबीन काढणीसाठी जादा खर्च करावा लागला. त्या तुलनेत मिळणारा भाव कमी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन विक्री करणे परवडणारे नाही. नुकसान सहन करण्यापेक्षा काही दिवस दर वाढीची प्रतीक्षा केलेली बरी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे काही दिवसांत दर वाढतील, या आशेने शेतकर्यांनी विक्री थांबविली आहे.
परिणामी, बाजारपेठेतील आवकही घटली आहे. तालुक्यात गत खरीप हंगामात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला होता. पीकही बहरले होते; परंतु ऐन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने अतोनात नुकसान झाले. त्यातून बचावलेल्या पिकांची काढणी केली. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांनी मिळेल त्या दराने सोयाबीनची विक्री केली. मात्र, मागील वेळी सर्वाधिक भाव मिळाल्याने आगामी काळातही चांगला दर मिळेल, म्हणून बहुतांश शेतकर्यांनी साठवणूक केली.
दिवाळीनंतर बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली. त्यामुळे शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. सुरुवातीलाच तीन ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल मिळणारा दर हा यावर्षी कमाल सहा हजारांपर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा उंचावल्या. आगामी काळात आणखी दर वाढेल, या आशेने शेतकर्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. महिनाभरापासून हा दर स्थिर नसल्याने शेतकर्यांनी सोयाबीन विक्री करणे थांबविले आहे. आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी गरजेनुसार सोयाबीन विक्री करीत आहेत, असे असताना व्यापार्यांकडून साठेबाजीची शंका आल्यानेच तेलकंपन्या आणि बियाणे कंपन्या शेतकर्यांच्या दारात हजर झाल्याने भविष्यात आणखी दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.