राजकीय दबावामुळेच केडगावचे रस्ते रखडले
अशा मागणीचे निवेदन केडगाव शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त आणि बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना बुधवारी देण्यात आले.

केडगाव उपनगर केडगाव परिसरातील रस्त्यांची कामे राजकीय दबावामुळेच रखडलेले आहेत, असा आरोप करत तीन प्रमुख रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावेत,
अशा मागणीचे निवेदन केडगाव शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त आणि बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना बुधवारी देण्यात आले.
केडगाव भागामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अंबिका बस स्टॉप ते पाच गोडाऊन, अर्चना हॉटेलपासून ते कांदा मार्केट आणि लिंक रोड भूषणनगर हे केडगावातील तीन प्रमुख रस्ते आहेत.
त्यांचे काम वर्षभरापासून बंद पडले आहे. अनेक छोटे-मोठे व्यवसाय येथे आहेत. रस्ता खराब असल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
अंबिका बस स्टॉप ते पाच गोडाऊन येथे पाच-पाच फुटांचे खड्डे खोदून ठेवले आहेत. मात्र, तेथे कोणत्याही प्रकारचे काम सुरू केले नाही.
अनेक नागरिक या खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले आहेत. काही नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेक नागरिकांना या रस्त्यांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केडगाव भागात राजकीय दबाव टाकून रस्त्यांचे काम बंद पाडल्याचा आरोप नगरसेवक अमोल येवले यांनी केला. त्यामुळे पालिका आयुक्त आणि बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक विजय पठारे, केडगाव विभाग प्रमुख संग्राम कोतकर, युवा सेनेचे ओंकार सातपुते, युवा सेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर,
डॉ. चेमटे, संतोष डमाळे, प्रशांत गारकर, जिल्हा प्रमुख पप्पू भाले, दीपक डोंगरे, ऋतिक लालबेंद्रे, शुभम साळवे, यश सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
..तर २५ ऑक्टोबरला आंदोलन
या दोन्ही अधिकायांनी येत्या २५ ऑक्टोबरला रस्त्याचे काम चालू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे २५ ऑक्टोबरला रस्त्याचे काम चालू न झाल्यास केडगाव येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.