धनादेश न वटल्याने न्यायालयाने दुकान मालकास ठोठावली शिक्षा

अहमदनगर- गाळा भाड्यापोटी अनामत दिलेले तीन लाख रुपये परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने श्याम मधुकर केदारे (रा. ए अँड डी रेजिमेंट, अहमदनगर) यास तीन महिने कारावास आणि एक लाख रुपये दंड जिल्हा सत्र न्यायाधीश मंदार पांडे यांनी ठोठावली आहे.
फिर्यादीतर्फे ॲड. सचिन घावटे यांनी काम पाहिले.
श्याम केदारे यांचा गाळा दोन महिन्यांसाठी साहित्य ठेवण्यासाठी भाडेतत्वावर इंद्रजित गयाप्रसाद सिंग (रा. गवळीवाडा) यांनी तीन लाख रुपये अनामत रक्कम देऊन भाडे कराराने घेतला होता. त्याबाबतचा करारनामा २६ जून २०१९ ला केला होता. दोन महिन्यांनी कराराची मुदत संपल्यावर गाळा खाली करून दिला.
गाळा मालक केदारे यांनी अनामत रक्कम तीन लाखांच्या परतफेडीसाठी बँकेचा धनादेश दिला. परंतु, त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वटला नाही. सिंग यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. आरोपी केदारे याच्याविरुद्ध आलेले पुरावे आणि साक्षी तसेच ॲड. सचिन घावटे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून ही शिक्षा ठोठावण्यात आली.