अहमदनगर

सहा जणांचा धुमाकूळ; दोन वाहनांवर सशस्त्र दरोडा

अहमदनगर- दोन वाहन चालकांना हत्याराच्या धाकाने लुटमार केल्याची घटना नगर-दौंड रोडवरील अरणगाव चौकात आज (रविवार) पहाटे घडली. या प्रकरणी वाहन चालक गणेश प्रकाश राठोड (वय 28 रा. पंढरपुर, वाळुंज ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दर्शन सुनील साळवे (वय 19 रा. शाहुनगर, केडगाव), ऋतीक नरवडे, रोहित पंडागळे, अमोल शिंदे, मयुर आगे, सौरभ (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. केडगाव) यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून यातील दर्शन साळवे याला ताब्यात घेतले आहे.

 

गणेश राठोड यांनी त्यांच्या मालवाहतूक वाहनामध्ये वाळुंज एमआयडीसी (जि. औरंगाबाद) येथून माल भरला. तो माल घेवून राठोड हे नगरमार्गे दौंड रोडने बेंगलोरकडे घेवून जात असताना अरणगाव चौक येथे रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सहा जणांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. वाहनाची काच फुटल्याने राठोड थांबले. चोरट्यांनी त्यांच्या वाहनात चढून त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण केली. धारधार हत्याराचा धाक दाखवून रोख रक्कम, कागदपत्रे बळजबरीने काढून घेतले.

 

याच वेळी पहाटे बालाजी लक्ष्मण पवार (रा. होनसळ ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) हे सोलापूरवरून सिन्नरकडे (जि. नाशिक) जात असताना त्यांना पाच ते सहा चोरट्यांनी आडविले. चॉपरने मारहाण करीत त्यांच्याकडी रोख रक्कम, मोबाईल, कागदपत्रे असा ऐवज काढून घेतला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button