सुटीवर आलेल्या जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू ! लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय २३) असे मृत पावलेल्या जवानाचे नाव आहे. मंगळवारी बेकरवाडी येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे.

सेनादलात कार्यरत असलेले जवान असताना सुट्टीवर अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताहराबाद (बेलकरवाडी) येथे सोमवारी दुपारनंतर घडली,
ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय २३) असे मृत पावलेल्या जवानाचे नाव आहे. मंगळवारी बेकरवाडी येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ आणि भावजयी असा परिवार आहे.
जवान ज्ञानेश्वर ढवळे २०२१ मध्ये लष्करात भरती झाले होते. ९ मराठा लाईट इन्फंट्रीत ते कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली हिमाचल प्रदेश येथे झाली होती. बेलकरवाडी परिसरात पडत असलेल्या पावसाने गावतळ्यात पाणी जमा झाले होते.
ते आपल्या मित्रासमवेत तळ्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्यात खाली गेले, ते पाण्याच्या वर आलेच नाहीत, मित्रांनी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तळ्यातील पाणी गढूळ असल्याने शोध घेण्यात अडचण आली.
त्यामध्येच त्यांचा बुडून मृत्यू झाला. नंतर त्यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथे आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मंगळवारी बेलकरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे,
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी तर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार चंद्रशेखर राजपूत, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. नगरहून आलेल्या लष्कराच्या व राहुरी पोलिसांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.