अहमदनगर

चोरटे टॅक्टर घेऊन आले व शेतातील पाच टन कांदा घेऊन फरार झाले

राहाता तालुक्यातील वाकडी येथील एका शेतकऱ्याचा साडेचार ते पाच टन कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे वाकडी परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोपान विठ्ठल मोमले असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाकडी येथील शेतकरी सोपान मोमले यांचे वाकडी-राजुरी रस्त्यालगत शेतजमीन आहे. या क्षेत्रात सुमारे पावणेदोन एकर कांदा पिक घेतले होते.

सदर कांदा काढणीचे काम दोन दिवसांपासून सुरु होते. शुक्रवारी सदर कांदा काढून शेतातच पोळ घातला होता. दरम्यान मोमले 9 एप्रिल रोजी सकाळी कांदा पोळ झाकण्यासाठी सकाळी 7 वाजता गेले असता कांद्याची एक पोळच चोरट्यांनी भरून नेली असल्याचे दिसून आले.

या क्षेत्रात टॅक्टरचे निशाण आढळून आले असून टॅक्टरद्वारे कांदा चोरून नेल्याचे प्रथमदर्शी दिसल्याचे सोपान मोमले यांनी सांगितले. कांद्याने भरलेले टॅक्टर हे जवळील पडीक जमीनमार्गे अस्तगाव रोडला लागून श्रीरामपूरच्या दिशेने गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

या एका कांद्याच्या एका पोळीत साडेचार ते पाच टन माल असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या बाजारभावानुसार हा 45 ते 50 हजाराचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

विशेष बाब म्हणजे या भागातून कित्येकवेळा स्प्रिंकलर गण, विद्युत पंप, पाईप चोरीला गेले आहे. मात्र चोरटे मात्र सापडले नाहीत. सदर कांदा चोरी प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविणार असल्याचे मोमले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button