तिघांनी फायनान्स कंपनीलाच लावला 10 लाखाला चुना

अहमदनगर- बनावट ग्राहकांच्या माध्यमातून कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची नऊ लाख 69 हजार 819 रूपयांची फसवणूक झाली आहे. या कंपनीला फसविणार्या दुकानदार आणि कंपनीच्या कर्ज वितरण अधिकार्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक्षा आणि राहुल पठारे (रा. सावेडी) या मोबाईल शॉपी चालक दाम्पत्य आणि कंपनीचे प्रतिनिधी अजय वाबळे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
विक्रम नामदेव गांगर्डे (वय 27, रा. टिळक रस्ता, माळीवाडा, मूळ रा. नाशिक) हे बजाज फायनान्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बजाज फायनान्स कंपनीच्यावतीने ज्या ग्राहकांना घरगुती इलेक्ट्रीक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कर्ज दिले जाते. कंपनीच्यावतीने विविध दुकानात कर्ज प्रतिनिधींची ग्राहकांना कर्ज दिले जाते.
कर्ज वितरण प्रतिनिधीवर ग्राहकाचे ओळखपत्र, राहत्या घराता पत्ता, बँकेचा धनादेश, बँक खाते क्रमांक आदी कागदपत्रांची खात्री करून घेण्याची जबाबदारी आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तूचा फोटो आणि पक्के बिल यांच्या प्रती कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करावे लागते. या वस्तूची रक्कम दुकानदाराच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने जमा केली जाते. कंपनी ग्राहकाकडून बँक खात्यातून कर्जाच्या हप्ता दर महिन्याला वसूल करते. कंपनीकडून दर महिन्याच्या दोन तारखेला ही रक्कम खात्यातून कपात करून घेतली जाते.
सावेडीतील बालिकाश्रम रस्त्यावरील गंधे मळ्यातील प्रज्वल मोबाईल शॉपी या दुकानातून मार्च 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान कर्ज प्रकरणे केलेल्या 70 ग्राहकांचे बनावट कागदपत्रे आढळून आले आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींनी या प्रकरणांची तपासणी केली. त्यापैकी 24 ग्राहकांचे हप्ते थकलेले आहेत. ग्राहकांना दुसर्या वस्तू दिल्या आहेत. फायनान्सने मंजूर केलेल्या कर्जाची काही रक्कम ही कर्ज वितरण प्रतिनिधी अजय वाबळे यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आढळून आली. फायनान्सची नऊ लाख 69 हजार 819 रूपयांची फसवणूक झाली आहे. प्रज्वल मोबाईल शॉपीचे मालक प्रतिक्षा राहुल पठारे, चालक राहुल पठारे आणि कर्ज वितरण प्रतिनिधी अजय वाबळे यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.