तरूण लघुशंकेसाठी थांबला; तिघांनी तोंड दाबले आणि…

प्रवासादरम्यान लघुशंकेसाठी थांबलेल्या तरूणाला तिघांनी मारहाण करून दुचाकी, रोख रक्कम व मोबाईल असा 47 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.
अहमदनगर-कल्याण रोडवरील ड्रिमसिटी सोसायटी जवळ मध्यरात्री ही घटना घडली. गेणु तुळशीराम रोहोकले (वय 40 रा. नागबेंदवाडी, भाळवणी ता. पारनेर) असे लुटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेणु रोहोकले हे त्यांच्या बहिणीकडे नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथे गेले होते.
गाय घेण्यासाठी बहिणीकडून 25 हजार रूपये घेऊन रोहोकले घरी परत जात असताना कल्याण रोडवर ड्रिमसिटी सोसायटीच्या अलिकडे 100 मीटरवर ते लघुशंकेसाठी थांबले होते.
त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी रोहोकले यांचे तोंड दाबून मोकळ्या जागेत घेऊन गेले. एकाने रोहोकले यांना हातातील कड्याने मारहाण करून जखमी केले.
इतर दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिघांनी रोहोकले यांच्या खिशातील 25 हजाराची रोख रक्कम, एक मोबाईल व त्यांची दुचाकी घेऊन पोबारा केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहेत.