ट्रॅक्टर घेतलं, तरीही म्हणतात घेतलंच नाही; दोघांवर गुन्हा

अहमदनगर- सावेडी येथील शोरूममधून ट्रॅक्टर घेतल्यानंतरही दोघांनी ट्रॅक्टर घेतला नसल्याचा कांगावा केला. शोरूम मालकाची सहा लाख 36 हजार 743 रूपयांची फसवणूक केली.
साई सोनालिका ट्रॅक्टर शोरूमचे मालक विजय सदाशिव वाकळे (वय 52) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय ससाणे (रा. धामणगाव ता. आष्टी, जि. बीड) व तुषार हरी खंडागळे (रा. पाटण सांगवी ता. आष्टी, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे कोठी रोड, मार्केटयार्ड येथे साई सोनालिका ट्रॅक्टर या नावाने ट्रॅक्टर विक्रीची एजन्सी असुन सदर एजन्सीचे सावेडीत गोडाऊन आहे. एजन्सी मार्फत विक्री केलेल्या ट्रक्टरची डिलीव्हरी सदरच्याा गोडाऊन मधुन होते. 7 सप्टेंबर 2022 रोजी विजय ससाणे आणि तुषार खंडागळे यांनी फिर्यादी यांच्या ऑफिसला येवून पाचशे रूपये रोख पावती भरुन कविता हरी खंडागळे यांच्या नावाने ट्रॅक्टरची बुकिंग केली.
8 ऑक्टोबर, 2022 रोजी तुषार याने त्याची आई कविता हरी खंडागळे या नावाने एचडीएफसी शाखा पाईपलाईन रोड येथे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सहा लाख 36 हजार 743 रूपयांची कर्ज फाईल मंजुर केली. त्यानंतर तुषार आणि विजय या दोघांनी फिर्यादी यांच्या एजन्सीमध्ये येवुन एक लाख रूपये रक्कम भरले. त्यानंतर 10 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी तुषार आणि विजय या दोघानी रोख रक्कम 41 हजार रूपये भरून सोनालिका डिआय 750 मॉडेलचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर खरेदी केला.
दरम्यान त्यानंतर एचडीएफसी बँकने मंजुर लोन रक्कम फिर्यादी यांना दिली नाही. फिर्यादी यांनी तुषार खंडागळे यास फोन केला असता तुषारने सदरचा ट्रॅक्टर विजय ससाणे याने ताब्यात घेतला आहे असे कळविल्याने फिर्यादी यांनी विजय ससाणे यांना फोन केला असता आम्ही दोघांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतलेला आहे, असे कळविले आहे. म्हणुन त्या दोघांनी संगनमताने फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.