लोखंडी पाईप, गज, लाकडी दांडके घेऊन दोन गट भिडले

किरकोळ कारणातून नगर तालुक्यातील भोरवाडी येथे दोन गटात चांगलाच राडा झाला. या वादात लोखंडी पाईप, गज, लाकडी दांडक्याने दोन्ही गटांच्या व्यक्तींमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्ही गटाच्या 11 व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय हरीभाऊ भोर (वय 43) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र भानुदास भोर, आकाश नितीन भोर, शिवाजी आबासाहेब भोर, विकास आबासाहेब भोर, अमित नितीन भोर, हरिष बाबासाहेब भोर (सर्व रा. भोरवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंंकाळी आठ वाजता फिर्यादी दत्तात्रय भोर यांच्या मुलाच्या गाडीचा धक्का लागला असता त्याचा राग येऊन राजेंद्र भोर याने फिर्यादीची पत्नीच्या डोक्यात लाकडाने मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसर्या गटाचे विकास बाबासाहेब भोर (वय 19 रा. भोरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र हरिभाऊ भोर, शुभम दत्तात्रय भोर, सोमनाथ रामदास भोर, गणेश एकनाथ भोर, ऋषीकेश बंडू भोर (सर्व रा. भोरवाडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी फिर्यादी विकास भोर कामरगाव (ता. नगर) येथे औषध आणण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना थांबविले. आमच्या विरूध्द काम का करता, असे म्हणत शिवीगाळ करून लाकडी काठी, लोखंडी पाईप व लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.