Ahmednagar Crime : काळे जॅकेट घालून दुचाकीवर आलेल्या दोघांनी ‘असे’ चोरले दोन तोळे

रस्त्याने पायी जाणार्या रेखा प्रकाश कंठाळे (वय 55 रा. अजिंक्य कॉलनी, बोरूडे मळा, सावेडी) यांच्या गळ्यातील 60 हजार रूपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लंपास केली.
सावेडी उपनगरातील आराधणा संगितालय, किंग्ज कॉर्नर, रासणेनगर येथे ही घटना घडली. कंठाळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी दोघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास रेखा कंठाळे व त्यांच्या सोबत आणखी एक जण पायी जात असताना साडेनऊ वाजेच्या सुमारास आराधणा संगितालय, किंग्ज कॉर्नर, रासणेनगर येथे पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी रेखा कंठाळे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन ओरबडून धूम ठोकली.
दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी अंगात काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेले होते. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठीला एक बॅग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.