‘पाबसाळ्यात पाणी तुंबलेले चालणार नाही; पालकमंत्र्यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा

रविवार दि. ९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर पुणे शहरात काही ठिकाणी पाणी तुंबले होते. पुणे महानगरपालिकडून पावसाळी कामाला सुरू झाल्याने जर पाणी तुंबले असेल तर ते चालू शकते.
मात्र ऐन पावसाळ्यात जून आणि जुलै या महिन्यात पाणी तुंबलेले चालणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तर पुणे महानगरपालिकेचा निवडणुका होईपर्यंत दर महिन्याला आढावा घेणार असल्याचे सुतोवाचही पाटील यांनी दिले आहे.
तसेच बालभारती यौड रस्त्याबाबत पर्यावरणवाद्यांशी बोलणी करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पाटील यांनी सोमवारी पालिकेत बैठक घेतली.
या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.
पाटील यांनी ९ मेपर्यंत पालिका निवडणुकांबाबत न्यायालयाकडून निर्णय आल्यास ऑक्टोबर २०२३ मध्ये निवडणुका होतील असे भाकित केले आहे. ते पुढे म्हणाले, मागील वर्षी पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले होते.
वाहतुकीची कोंडी झाली होती. पालिकेचा गाडा हाकण्यासाठी नगरसेवक नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सूचना केल्यानंतर आढावा बैठक घेण्यात आली आहे.
आढावा बैठकीच्या निमित्ताने अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. बालभारती पौड रस्त्याबाबत ते म्हणाले, हा रस्ता १९८७ पासून प्रलंबित आहे.
हा रस्ता झाल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही. याबाबत खात्री आहे. तरी सुद्धा काही पर्यावरणवादीसंघटना याला विरोध करीत आहे. हा विरोध लक्षात घेऊन मी स्वतः त्यांच्याबरोबर याबाबत बोलणी करणार आहे.