घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या आणि चोरट्याने रोकड केली लंपास

राहुरी शहरात काही महिन्यापासून शांत असलेल्या बांबू गँगने पुन्हा आपली हाथ की सफाई दाखविली. डॉ. साळवे यांच्या घरातील पर्स अलगदपणे बाहेर काढून पर्समधील 10 हजार रुपयांची रोकड पळवून नेली.
त्यामुळे शहरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत डॉ. श्रीमती केतन विद्यासागर साळवे (वय 33 वर्षे, रा. भालचंद्र वसाहत, गोकुळ कॉलनी, राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी शहरातील दुधाडे कॉम्प्लेक्स, गोकुळ कॉलनी येथे त्यांची पॅथॉलॉजी लॅब आहे. दि. 5 एप्रिल रोजी रात्री डॉ. साळवे या व घरातील इतर लोक जेवण करुन घरातील हॉल मध्येच सर्वजण झोपी गेले.
यावेळी घराचे हॉल व बेड रुमच्या खिडक्या उघड्या होत्या. डॉ. साळवे यांच्या सासू सुरेखा यांची पर्स बेडरुमच्या दरवाजाला लटकवलेली होती.
दि. 6 एप्रिल रोजी घरातील कुटुंबीयांनी पर्स खोलून पाहिली तर पर्समधील 10 हजार रुपये गायब झाल्याचे दिसून आले. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाला अटकवलेली पर्स मधील 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली.
याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.