कामगाराने मालकाला लावला चुना; 5.70 लाखाची रोकड घेऊन झाला पसार

अहमदनगर- कापड व्यावसायिक जानिमल भोजराज नवलानी (वय 71 रा. श्रीनाथ कॉलनी, सासाणेनगर, सावेडी) यांनी त्यांच्याकडे कामाला असलेला राकेश कुंडलीक जावळे (रा. तारकपूर) याच्याकडे व्यावसायातून जमा झालेली पाच लाख 70 हजार रूपयांची रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी दिली होती. ती रक्कम घेऊन जावळे आपल्या पत्नीसह पसार झाला आहे.
या प्रकरणी कापड व्यावसायिक जानिमल भोजराज नवलानी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून राकेश कुंडलीक जावळे (रा. तारकपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे बंगाल चौकी येथे कापड दुकान आहे. सुमारे तीन वर्षापासुन राकेश जावळे हा फिर्यादीकडे कामाला होता. तो फिर्यादी यांच्या दुकानातील कामासह घरचेही काम करत होता. तसेच फिर्यादी यांच्या बँकेच्या व्यवहाराबाबतही त्याला माहिती होते. दुकानातील जमा झालेली रक्कम तो सांगेल तेव्हा मर्चट बँक डाळ मंडई येथे जमा करत होता. त्यामुळे फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास होता.
कापड्याच्या दुकाणातून दिपावली सणानिमीत्त विक्री झालेल्या मालाचे पाच लाख 70 हजार रूपये 28 ऑक्टोबर, 2022 रोजी सायंकाळी फिर्यादी यांनी राकेश जावळे याच्याकडे बँकेत भरणा करण्यासाठी दिले होते व त्याला ते दिनांक 29 ऑक्टोबर, 2022 सकाळी बँक चालु झाल्यानंतर बँकेत भरण्याबाबत सांगितले.
दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी यांचा मुलगा जयकिशन याने राकेश याचा मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क झाला नाही. तसेच त्याच्या पत्नीच्या मोबाईलवरही संपर्क झाला नाही.
दरम्यान त्यांच्या घराला कुलूप असून त्याने दिलेले पैसे बँकेतही जमा केलेले नसल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले आहे. यानंतर फिर्यादी यांनी बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राकेश जावळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.