माल वितरणातून जमा झालेल्या रकमेचा कामगाराने केला अपहार

अहमदनगर- नगर शहरासह जिल्ह्यात अॅमेझन कंपनीचे माल वितरणातून डिलेव्हरी बॉय मार्फत जमा झालेली दोन लाख 90 हजार 109 रूपये रक्कमेचा प्रोसेस असोसिएट म्हणून काम पाहणारा सोयल दाऊत पठाण (रा. बेलदार गल्ली, तेलीखुंट, नगर) याने अपहार केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी कंपनीचे कार्यकारी अधिकारी मयूर भीमराव शिंदे (वय 33 रा. दत्तवाडी आकुर्डी, पुणे) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्विसेज प्रा.लि. या कंपनीमार्फत नगर शहरासह जिल्ह्यात अॅमेझन कंपनीचे शिपमेंट डिलेव्हरी (माल वितरणाचे) काम केले जाते. माल वितरणातून डिलेव्हरी बॉय मार्फत जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब ठेवून ते पैसे सीएमएस मार्फत कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी प्रोसेस असोसिएट म्हणून काम पाहणारा सोयल पठाण याच्यावर होती.
त्याने 20 ऑक्टोबर 2022 रोजी डिलेव्हरी बॉय यांच्याकडून जमा झालेली दोन लाख 90 हजार 190 रूपयांची रक्कम दुसर्या दिवशी 21 ऑक्टोबर, 2022 रोजी सीएमएस मार्फत कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता 21 ऑक्टोबर, 2022 पासून कामावर गैरहजर राहून रक्कमेचा अपहार केला आहे. म्हणून शिंदे यांच्या फिर्यादीवरून पठाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.