अहमदनगर

हॉटेलमधील कामगार निघाले नराधाम; तरूणीवर केला सामुहिक अत्याचार

अहमदनगर- नगर शहरातील स्नेहालय या संस्थेत राहत असलेली तरूणी रागाच्या भरात शिर्डीला निघून गेली होती. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना तिने दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान तरूणीवर शिर्डी येथे हॉटेलवर कामाला असलेल्या तरूणांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. येथील एमआयडीसी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांकडून तपासाबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. त्यांनी अटक केलेल्या आरोपींचे नावे सांगण्यात नकार दिला आहे.

 

स्नेहालयात राहत असलेली तरूणी 14 जुलै 2022 रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास निघून गेली. त्यानंतर ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. शिर्डी येथे हॉटेलमध्ये काम करणार्‍या तरूणांनी त्या तरूणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हे तरूण जळगाव जिल्ह्यातील असून ते शिर्डीमध्ये राहत होते. त्यांनी दिवाळीचे आगोदर रात्रीचे वेळी जेवण देतो, असे सांगून तरूणीला त्यांच्या रूमवर घेऊन गेले. हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. तिच्यावर अत्याचार केला.

 

 

दरम्यान यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी मुळचे जळगाव जिल्ह्यातील व सध्या शिर्डीत वास्तव्यास असलेल्या दोन तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

 

त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशीसाठी न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींचे नावे प्रसिध्द करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक आठरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button