तरूणीची घरात घुसून छेड काढली; न्यायालयाने तरूणाला…

घरात घुसून तरूणीचा विनयभंग करणार्या तरूणाला जिल्हा न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी व 16 हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. आठ हजार रूपये फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
फैजान कलमी बागवान (रा. धरती चौक, पारशा खुंट, अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.
10 नोव्हेंबर, 2017 रोजी सायंकाळी बागवान हा फिर्यादीच्या घराच्या मागील दरवाजाने घरात घुसला व फिर्यादीसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे पीडिता ओरडली व त्यावेळी बागवान त्याच्या हातातील कर्हाडीने जीवे ठार मारतो असे म्हणून कुर्हाड मारली, परंतू पिडीतेने तो मार हुकावला.
पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बागवान विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी करून न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस हवालदार पारखे यांनी सहकार्य केले.