युवक तीन दिवसांपासून होता बेपत्ता; नदीपात्रात आढळला मृतदेह

अहमदनगर- पाचेगाव (ता. नेवासा) येथील एक युवक गेल्या तीन दिवसापासून घरी काही न सांगता निघून गेला होता. त्यावेळी नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर आता या युवकाचा मृतदेह एका नदीपात्रात आढळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप कल्याण नामेकर (२०) असे युवकाचे नाव असून गुरुवार (दि.१२) रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील निंभारी गावाच्या हद्दीत मुळा नदी पात्रातील पाण्यामध्ये त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.
दरम्यान, त्यानंतर सदरची माहिती निंभारीचे पोलीस पाटील संतोष पवार यांना मिळाली असता त्यांनी लगेच नेवासा पोलिसांना कळवली. यानंतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्यासह पोलीस हवालदारांनी घटनास्थळी दाखल होत सदर मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.