अहमदनगर

दुचाकीवर बसलेल्या अनोळखी व्यक्तीनं युवकाला लुबाडलं

 

अहमदनगर- बँकेतून 50 हजार रूपयांची रक्कम घेऊन बाहेर पडलेल्या युवकाला अनोळखी व्यक्तीने लुबाडले. त्या अनोळखी व्यक्तीने युवकाच्या खिशातील 50 हजाराची रोख रक्कम काढून घेतल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. या प्रकरणी हर्षल दत्तात्रय कुसमुडे (वय 21 रा. धामोरी ता. राहुरी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षल यांचे चुलते ज्ञानदेव यादव कुसमुडे (रा. तपोवन रस्ता, अहमदनगर) यांनी हर्षलकडे महाराष्ट्र बँक, सावेडी शाखेचा 50 हजार रूपयांचा चेक दिला होता. चेक वटवुन 50 हजार रूपये झुंबरराव बाचकर (रा. उंबरे ता. राहुरी) यांना देण्यास सांगितली होती. हर्षल यांनी महाराष्ट्र बँकेच्या सावेडी शाखेत चेक वटवून 50 हजार रूपयांची रक्कम ताब्यात घेतली, ती रक्कम त्यांनी पॅन्टच्या खिशात ठेवून दुचाकीवर बसले. त्यावेळी बँकेतून एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला.

प्रेमदान चौकामध्ये सोडा, असे म्हणाला असता हर्षल यांनी त्याला दुचाकीवर बसविले. हर्षल यांनी त्या व्यक्तीला प्रेमदान चौकात सोडल. तो व्यक्ती तेथून निघून गेल्यानंतर हर्षल यांनी खिशातील 50 हजार रूपये पाहिले असता त्यांना खिशामध्ये रक्कम दिसली नाही. सदर अनोळखी व्यक्तीने रक्कम चोरल्याचे हर्षल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button